Thursday 28 August 2014

हे गणराया! मंगलमय कर रे बाबा !!




आजच्या धकाधकीच्या जीवनात परिवर्तन नियमाप्रमाणे होत आहे. याबरोबर माणुसकीही बदलत आहे. मी २०११ ला पत्रकारिता आणि संज्ञापन च्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाला असतांना आम्ही सुसंवाद नावाने अनियतकालिक प्रसिद्ध केले होते. त्यात 'गणेशोत्सव विशेषांक' हा माझा विषय होता. त्यामध्ये मी लिहिलेले संपादकीय आजही तीन वर्षानंतरही तंतोतंत लागू होते. आणि "परिवर्तन हा संसारचा नियम आहे" यावर विश्वासच बसत नाही. यासाठी मुद्दामून ते पान या पोस्टसोबत देत आहे. त्यामध्ये गणरायाला केलेली प्रार्थना या गणेशोत्सवातही करावीशी वाटते. 




सोबतच माझ्या मित्रांने दिलेले लेखही जोडले आहेतच. 

तुम्हाला गणेशोत्सवाच्या शुभेच्छा!!

Wednesday 27 August 2014

डॉ. सुधा मूर्ती : प्रसन्न भावमुद्रेच्या धनी

दिवस, वेळ, ठिकाण ठरलेले आणि त्याचबरोबर येणाऱ्या पाहुण्याही ठरलेल्या. पण तयारी चालू ती आमची सगळ्यांचीच. आज आमच्या ऑफिसला डॉ. सुधा मूर्ती येणार म्हटल्यावर मन दोन दिवसांपासून प्रसन्न होते. सर्व जण त्या वेळेची वाट पाहत होते. तो क्षण आला. डॉ. मूर्ती आल्यात. त्यांच्या प्रसन्न मुद्रेने त्यांनी सर्वांना आपलेसे केले. आम्ही त्यांच्याजवळ उभे होतो, यातच आम्हाला मोठेमोठे वाटायला लागले.

डॉ. सुधा मूर्तींसोबत मी आणि माझे सहकारी.


त्यांच्या स्वाक्षरी साठी माझी लगबग सुरु झालेली, त्यासाठी सर्वांचेच प्रयत्नही सुरु होते. आमच्या ऑफिसच्या शोरूमला भेट दिल्यानंतर त्यांनी खास आमच्यासाठी काही क्षण दिलेत. तेव्हा डॉ. मूर्ती यांनी मनमोकळे केले. त्यांनी आम्हाला त्यांची एक छोटीशी गोष्ट सांगितली. ती ऐकून आमच्यापैकी बऱ्याच जणांना भरून आले. त्यांची भावमुद्रा आणि बोलणे याने आम्हाला एक नवीन उर्जा दिली.


त्यांच्या या छोट्याश्या भेटीतून मला त्यांना काही द्यायचे होते. ते मी वहीवर लिहूनही ठेवलेले, त्यांना दाखविले आणि त्यावर त्यांची स्वाक्षरीही घेतली. ते लिहिलेले शब्द पुढीलप्रमाणे :-


" आपली पुस्तके म्हणजे आमच्या आयुष्याचे धडे गिरवताना लागणारे तर आहे पण त्याचबरोबर आपण सांगितलेल्या आजीच्या पोतडीतल्या, थैलीभर किंवा मग गोष्टी माणसांच्या यामधून जीवनाच्या परीघाची ओळख, अस्तित्वाची जाण झाली. सामाजिकतेचे भान आणि विसर पडलेली माणुसकी तुम्ही आपल्या वाइज अदरवाइज, सुकेशिनी, बकुळा आणि पुण्यभूमी भारत मधून दर्शविली.


आपण कितीही मोठे झालो तरी आपण आपले पितृऋण कधीही विसरले नाही पाहिजे.शेवटी काय तर सामान्यांतले असामान्य कोण? याची ओळख करून आपण आपल्या सभोवतालच्या डॉलर बहु, महाश्वेता यांसारख्या डोळे उघडणाऱ्या सत्याचे ज्ञान करून दिले."


नेहमी आम्हाला आपल्या अनुभवातून शब्दधन देण्यासाठी धन्यवाद !!

                                                        - गोपाल अनिलकुमार पालीवाल

Tuesday 19 August 2014

विविधतेत एकता

नमस्कार, भरपूर दिवसांपासून लिहायचे ठरवतोय पण वेळ काही निघत नाही. म्हटले एकत्रित लिहूया, घडलेल्या काही रोचक आणि मनोवेधक गोष्टी.

शनिवारी संध्याकाळी ऑफिस सुटले आणि मी गावाकडे जाण्यास निघालो. वेळेत रेल्वे मिळाली पण जागा नेहमीप्रमाणे छीन्के घ्यावी लागली, नंतर तो सहप्रवासी गावाकडचा निघाला. प्रवासातील गम्मत आणि त्यातून मिळणारे सदबोध याचा प्रत्यय मला या प्रवासात आला.

गाडी सुरु होण्याच्या काही क्षणापूर्वी एक तरुण गर्दीला सावरत आमच्या जागेजवळ आला आणि म्हणाला, "मला पण जागा द्या भाऊ, गावाकडची माणूस आपण तर !" हे शब्द ऐकताच त्याला जागा दिली. येथून सुरु झाली माझी खरी गोष्ट. त्या तरुणाचे भारतीय सेनेतील महार - बटालियन मध्ये सिलेक्शन होणार होते. त्याची तो परीक्षाही देऊन आला होता. त्याच्या बोलक्या स्वभावाने आमच्या जवळील सर्व प्रवाश्यांना आपलेसे केले. 

त्याचे एक एक वाक्य हे देशप्रेमाने आणि मी कसा आपल्या देशासाठी कामास येऊ शकतो, यासाठी आणि यानेच भरलेले होते. तो सांगत होता. आपल्या खेड्यातील मुले , आदिवासी मुले थोडी जरी जास्त मेहनत करतील तर देशासाठी नक्कीच कामी येतील. आमच्या पाचोरा, भडगाव, तसेच खानदेशातील भरपूर मुले यासाठी मेहनत घेतात. हे ही तो छातीठोकपणे सांगत होता.

या सर्व गोष्टी एकूण मला क्षणभर वाटले, आपण एवढे शिकूनही जे नाही बोलण्याची हिम्मत करू शकत ती हिम्मत हा खानदेशी जवान करतोय. याचे अप्रूप वाटले. या सर्वांमध्ये आमच्यासोबत दोन महाराष्ट्र बाहेरील तरुण होते की जे त्यांच्या गावी जात होते, त्यांना सुद्धा या तरुणाने शब्द मोहिनी टाकली. त्यातील एक 12 वी चे शिक्षण घेत असलेल्या मुलाला तर त्याने चक्क कौन्सलिंगच देऊ केली. 

त्याला आपली स्वतःची सर्व कागदपत्रे दाखवून सैन्यात जाण्यासाठी काय काय करावे, कोणते कागदपत्रे, कोणाकडून तयार करावी याचेही मार्गदर्शन केले. त्याची ही धडपड केवळ देशासाठी आणि फक्त देशासाठी. हे पाहून मला खूप बरे वाटले. भारतात विविधतेत एकता मी वाचली आणि बोलली होती, पण पहिली पहिल्यांदा !

खरच त्या तरुणाने माझ्या मनावर मोहिनी टाकली होती. त्या तरुणाचे नाव मनोज, कदाचित हा प्रसंग मी ब्लॉगवर टाकण्याच्या काळात तो त्याच्या पोस्टिंगवर गेलाही असेल.
असो, पण यावरून हेच सिद्ध होते अजूनही भारतात खरे मातृभक्त आणि जवान आहेत. त्याचबरोबर विविधतेत एकता आहे.

जय हिंद !! 

For more info Please visit :- http://indiannavy.nic.in/

Saturday 2 August 2014

तुम्हा सर्वांना मैत्रीदिनी शुभेच्छा...!!@@!!


पुन्हा काही वेळ काढून लिहित आहे, त्या मित्रांसाठी ज्यांनी माझ्यासोबत राहून मला बरेच काही शिकविले. थेट बालवाडीपासून तर मास्टर्सपर्यंतचे, नोकरीच्या निमित्ताने मार्गदर्शक आणि माझे कुटुंबीय अशा सर्व मित्रांनो तुम्हा सर्वांना या मैत्रीदिनी शुभेच्छा !!


तसे दिवसाची वाट मी पाहत नसतो. पण या सोशल मीडियाच्या जगात आता हे सर चालायचेच.

मित्र हा तसा आपल्यासोबत एक भावाप्रमाणे असतो. त्याची प्रत्येक गोष्ट ही कशी मनाला कळते. ती तितक्याच हक्काने मनाला भिडतेही. अश्याच मनाला थेट भिडणाऱ्या आणि प्रसंगी माझ्यासाठी समोरच्याशी भिडणाऱ्या मित्रांचा सहवास मला लाभला. त्यामुळे मी स्वतःला खऱ्या अर्थाने मैत्रीपूर्ण आणि "मित्रसंपन्न" समजतो.

त्यांच्यासोबत खाल्लेला शाळा सुटल्यानंतरचा ‘पोंगा-पंडित’, सोबत खेळलेला फुटबॉल, क्रिकेट चा खेळ (अल्युमिनियमच्या पेटीचा स्टंपवाले क्रिकेट), केलेली धूम, मस्ती आणि उडविलेली टिंगल. कॉलेजमध्ये याच मित्रांसोबत केलेले पराक्रम, कार्यक्रम आणि कट्ट्यावरील मस्ती. 

यानंतर थोडे विभागलो आम्ही सर्व मित्र. पण, पुन्हा जेव्हा मास्टर्स करायला गेलो तेव्हा पुन्हा नवीन मित्र-मैत्रीणींशी गट्टी जमली. त्यांच्यासोबतचा कट्ट्यावरील अभ्यास, लॉजिकल शब्दांचे केलेलं शब्द-हरण, त्यापासून तयार केलेले नवीनशब्द (कळ्या, अभ्युप्गम, गृहीतके आणि अनेक आहेत). पण, गेलेले दिवस त्या आठवणी, नोंदवही काही अभ्यासाच्या निमित्ताने उघडल्यावर समोर उभे राहतात. मन थेट त्या ठिकाणी पोहचते आणि म्हणते.... काय किती असाईनमेंट झाल्या? आणि काय लेक्चर पुन्हा बुडाले....सर ओरडतील आता....
 
असो...मनात त्या आठवणी होत्या त्या माझ्या या ब्लॉगद्वारे शेअर केल्यात. आपणदेखील मन मोकळे करू शकतात. त्यासाठी कोणतेही आमंत्रण नाही कृपया आपणही आपल्या मैत्रीच्या आठवणी सांगाव्यात. किंवा याठिकाणी येऊन केवळ लाईक न करता आपली कमेंट नक्की टाका आवडेल मला..... त्यामुळे मला आणखीन लिहण्यास हुरूप मिळेल.....!!

धन्यवाद माझ्या सर्व मित्रांनो !!@@!!
तुमचा मित्र – गोपाल अनिलकुमार पालीवाल