Monday 20 February 2017

तरुणाईचे ‘लाइक’ कोणाला?

‘काय रे, कोणाचा जोर आहे तुमच्या प्रभागात?’
‘काही नाही भाऊ, जो सोशल मीडियावर जोरात तोच आपल्याकडे जोरात’
अशा संभाषणानंतर एक लक्षात येते की, तरुणांची उमेदवारांची पसंती ही सोशल मीडियावरून ठरते बहुतेक. ‘मी आपल्या प्रभागासाठी ही विकासकामे करणार, त्या समस्या सोडविणार’ असे सांगणारे अनेक उमेदवार सध्याला सोशल मीडियावर दिसत आहेत. ते केवळ तरुणाईला लुभावण्यासाठीच.

याच सोशल मीडियाच्या जोरावर आजच्या अडीच वर्षांपूर्वी आपले पंतप्रधान नरेंद्र मोदीनी भारतीयांवर अधिराज्य गाजवत सत्ता मिळवली. त्याच सोशल मीडियाच्या आधारे आताच्या महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकातही प्रचाराची यंत्रणा प्रत्येक पक्षाने कामाला लावली आहे. तरुणाच्या मनात जर प्रवेश करायचा असेल तर त्याच्या हातातील स्मार्टफोनमध्ये आधी प्रवेश करणे आवश्यक असल्याचे आजकालच्या राजकारण्यांनी चांगलेच ओळखले आहे. मग, ते व्हिडीओ, ऑडिओच्या माध्यमातून असो किंवा मग फेसबुक, ट्वीटर, व्हॉटसअप या सर्वच सोशल आणि खासकरून ऑनलाइन माध्यमांवर सध्या तरुणांना आपलेसे करण्यासाठी एक मोहीमच सुरू केली आहे. प्रत्येक पक्षाचा एक स्वतंत्र सोशल मीडिया विभाग यासाठी चोवीस तास कार्यरत आहे. जो तरुणांच्या मनातील ओळखून त्यांच्या सोशल मीडियावरील अकाउंटला जोडून हा सर्व खटाटोप करत असतो.

पण, याने खरच तरुणाईवर काही परिणाम होतो का, हा वेगळा प्रश्न आहे. मात्र, पक्षांकडून आपला उमेदवार तुमच्यासाठी काय काय करू शकतो, हे त्यांना त्यांच्या माध्यमांद्वारे पटवून दिले जाते. यालाच ‘स्मार्ट सोशल प्रचार’ म्हणता येईल. कधीकाळी, ‘ताई, माई, अक्का....’ अशा प्रचाराच्या पद्धतीने ढवळून निघणारे वातावरण आता केवळ रोजच्या ‘मेजेसेज, लाईक आणि शेअरवर’ येऊन थांबले आहे. ते केवळ तंत्र बदलले म्हणून नव्हे तर तरुणाईची पसंत बदलली म्हणून असेच म्हणावे लागेल.

नाशिककर तरुणाई तशी बरीच ऑनलाइन राहणारी आहे. त्यामुळेच रोजच्या घडणाऱ्या घटना या ट्वीटरवरून शेअर होतांना आपण पाहतोच. युवकांना सर्वात महत्त्वाचा आहे तो रोजगार, त्यांच्या रोजच्या समस्या या सर्वांवर एक पर्याय उपलब्ध करून देणारा उमेदवारच आम्ही निवडून देऊ, असाही काहीसा कल सध्याला दिसून येत आहे. रोजच्या कट्ट्यावर चालणाऱ्या गप्पातून तर थेट पर्सनल गप्पांमध्येही सध्या मनपात सत्ता कोणाची? यावरच बरीच तरुणाई चर्चा करतेय. त्यांनाही याचा हक्क आहेच की.

‘यहाँ के हम सिकंदर’ असे म्हणत आपल्यासोबत घडणाऱ्या प्रत्येक गोष्टींचे अपडेट या सोशल मीडियावर देणारी तरुणाई मतदानाबाबतही तेवढीच अपडेट आहे. आपल्या प्रभागात कोण उभे आहेत, त्यांनी कोणती विकासकामे केलीत आणि त्यांची आश्वासने काय, ही सर्व माहिती आजकाल युवकांना स्मार्टफोनमध्ये प्राप्त होते. यावरूनच ही तरुण पिढी त्यांच्या प्रभागातील उमेदवारांचे ‘सोशल ऑडीट’ करून त्यांना मतदान करतात. यासाठीच महापालिकेच्या प्रत्येक पक्षाच्या उमेदवाराने आपले एक पेज, सोशल मीडिया अकाउंट तयार करून त्याद्वारे आपला प्रचार चालविला आहे. पण, यालाही काहीसा धोका संभवतो. कारण, जास्त प्रचारही कधी कधी हानिकारक ठरू शकतो. अशा परिस्थितीत उमेदवारांनीही गाफील राहून चालणार नाही. तरुणाईला रुचेल तेवढेच देणे अपेक्षित आहे.
आपला शिक्का ठसून उमटवण्यासाठी काही हौशी उमेदवारांनी तर चक्क आपल्या नावाने मोबाइल अॅ‌प्लिकेशनच तयार केले आहेत. ज्याद्वारे आपल्या प्रभागातील उमेदवाराची सर्व माहिती त्याचे गुण, कौशल्य आणि त्याचा आश्वासननामा तो तरुण मतदारांसमोर ठेऊ शकतो. अशाप्रकारच्या अॅप्सने उमेदवार स्मार्ट तरुणाईला आपलेसे करत आहेत. त्यांना आपल्याकडे वळवण्यासाठी अशाप्रकारे त्यांनी एक युवकांची टीमही कामाला लावली आहे.

नाशिक महापालिकेच्या या निवडणुकीत पहिल्यांदा मतदान करणारी बरीच तरुणाई आहे. त्यासाठी सोशल मीडियावरील प्रचार एक उत्तम फंडा आहे. त्यामुळे आताच्या महापालिका निवडणुकीत आपला विजय निश्चित करण्यासाठी सर्वपक्षीय उमेदवार कामाला लागले आहेत. टेक्नोसेव्ही तरुणांनाही या फंड्यामुळे काहीशा प्रमाणात रोजगारही उपलब्ध झाला आहे. तसेच, सोशल मीडियात प्रचार करण्यासाठी विविध मीडिया कंपन्याही सरसावल्या आहेत. मात्र या सर्वांची मोहिनी नाशिकच्या तरुणाईवर कितपत पडते आणि तरुणाईचा ‘लाइक’ कोणाला मिळतो हे तर मतदानानंतरच कळेल.