Monday 20 February 2017

तरुणाईचे ‘लाइक’ कोणाला?

‘काय रे, कोणाचा जोर आहे तुमच्या प्रभागात?’
‘काही नाही भाऊ, जो सोशल मीडियावर जोरात तोच आपल्याकडे जोरात’
अशा संभाषणानंतर एक लक्षात येते की, तरुणांची उमेदवारांची पसंती ही सोशल मीडियावरून ठरते बहुतेक. ‘मी आपल्या प्रभागासाठी ही विकासकामे करणार, त्या समस्या सोडविणार’ असे सांगणारे अनेक उमेदवार सध्याला सोशल मीडियावर दिसत आहेत. ते केवळ तरुणाईला लुभावण्यासाठीच.

याच सोशल मीडियाच्या जोरावर आजच्या अडीच वर्षांपूर्वी आपले पंतप्रधान नरेंद्र मोदीनी भारतीयांवर अधिराज्य गाजवत सत्ता मिळवली. त्याच सोशल मीडियाच्या आधारे आताच्या महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकातही प्रचाराची यंत्रणा प्रत्येक पक्षाने कामाला लावली आहे. तरुणाच्या मनात जर प्रवेश करायचा असेल तर त्याच्या हातातील स्मार्टफोनमध्ये आधी प्रवेश करणे आवश्यक असल्याचे आजकालच्या राजकारण्यांनी चांगलेच ओळखले आहे. मग, ते व्हिडीओ, ऑडिओच्या माध्यमातून असो किंवा मग फेसबुक, ट्वीटर, व्हॉटसअप या सर्वच सोशल आणि खासकरून ऑनलाइन माध्यमांवर सध्या तरुणांना आपलेसे करण्यासाठी एक मोहीमच सुरू केली आहे. प्रत्येक पक्षाचा एक स्वतंत्र सोशल मीडिया विभाग यासाठी चोवीस तास कार्यरत आहे. जो तरुणांच्या मनातील ओळखून त्यांच्या सोशल मीडियावरील अकाउंटला जोडून हा सर्व खटाटोप करत असतो.

पण, याने खरच तरुणाईवर काही परिणाम होतो का, हा वेगळा प्रश्न आहे. मात्र, पक्षांकडून आपला उमेदवार तुमच्यासाठी काय काय करू शकतो, हे त्यांना त्यांच्या माध्यमांद्वारे पटवून दिले जाते. यालाच ‘स्मार्ट सोशल प्रचार’ म्हणता येईल. कधीकाळी, ‘ताई, माई, अक्का....’ अशा प्रचाराच्या पद्धतीने ढवळून निघणारे वातावरण आता केवळ रोजच्या ‘मेजेसेज, लाईक आणि शेअरवर’ येऊन थांबले आहे. ते केवळ तंत्र बदलले म्हणून नव्हे तर तरुणाईची पसंत बदलली म्हणून असेच म्हणावे लागेल.

नाशिककर तरुणाई तशी बरीच ऑनलाइन राहणारी आहे. त्यामुळेच रोजच्या घडणाऱ्या घटना या ट्वीटरवरून शेअर होतांना आपण पाहतोच. युवकांना सर्वात महत्त्वाचा आहे तो रोजगार, त्यांच्या रोजच्या समस्या या सर्वांवर एक पर्याय उपलब्ध करून देणारा उमेदवारच आम्ही निवडून देऊ, असाही काहीसा कल सध्याला दिसून येत आहे. रोजच्या कट्ट्यावर चालणाऱ्या गप्पातून तर थेट पर्सनल गप्पांमध्येही सध्या मनपात सत्ता कोणाची? यावरच बरीच तरुणाई चर्चा करतेय. त्यांनाही याचा हक्क आहेच की.

‘यहाँ के हम सिकंदर’ असे म्हणत आपल्यासोबत घडणाऱ्या प्रत्येक गोष्टींचे अपडेट या सोशल मीडियावर देणारी तरुणाई मतदानाबाबतही तेवढीच अपडेट आहे. आपल्या प्रभागात कोण उभे आहेत, त्यांनी कोणती विकासकामे केलीत आणि त्यांची आश्वासने काय, ही सर्व माहिती आजकाल युवकांना स्मार्टफोनमध्ये प्राप्त होते. यावरूनच ही तरुण पिढी त्यांच्या प्रभागातील उमेदवारांचे ‘सोशल ऑडीट’ करून त्यांना मतदान करतात. यासाठीच महापालिकेच्या प्रत्येक पक्षाच्या उमेदवाराने आपले एक पेज, सोशल मीडिया अकाउंट तयार करून त्याद्वारे आपला प्रचार चालविला आहे. पण, यालाही काहीसा धोका संभवतो. कारण, जास्त प्रचारही कधी कधी हानिकारक ठरू शकतो. अशा परिस्थितीत उमेदवारांनीही गाफील राहून चालणार नाही. तरुणाईला रुचेल तेवढेच देणे अपेक्षित आहे.
आपला शिक्का ठसून उमटवण्यासाठी काही हौशी उमेदवारांनी तर चक्क आपल्या नावाने मोबाइल अॅ‌प्लिकेशनच तयार केले आहेत. ज्याद्वारे आपल्या प्रभागातील उमेदवाराची सर्व माहिती त्याचे गुण, कौशल्य आणि त्याचा आश्वासननामा तो तरुण मतदारांसमोर ठेऊ शकतो. अशाप्रकारच्या अॅप्सने उमेदवार स्मार्ट तरुणाईला आपलेसे करत आहेत. त्यांना आपल्याकडे वळवण्यासाठी अशाप्रकारे त्यांनी एक युवकांची टीमही कामाला लावली आहे.

नाशिक महापालिकेच्या या निवडणुकीत पहिल्यांदा मतदान करणारी बरीच तरुणाई आहे. त्यासाठी सोशल मीडियावरील प्रचार एक उत्तम फंडा आहे. त्यामुळे आताच्या महापालिका निवडणुकीत आपला विजय निश्चित करण्यासाठी सर्वपक्षीय उमेदवार कामाला लागले आहेत. टेक्नोसेव्ही तरुणांनाही या फंड्यामुळे काहीशा प्रमाणात रोजगारही उपलब्ध झाला आहे. तसेच, सोशल मीडियात प्रचार करण्यासाठी विविध मीडिया कंपन्याही सरसावल्या आहेत. मात्र या सर्वांची मोहिनी नाशिकच्या तरुणाईवर कितपत पडते आणि तरुणाईचा ‘लाइक’ कोणाला मिळतो हे तर मतदानानंतरच कळेल.

Sunday 1 February 2015

बाबूजींना शब्दांजली.....

नमस्कार, बऱ्याच दिवसानंतर भेटतोय. पण असो, काही गोष्टी न सांगितलेल्या बऱ्या असतात.

आज माझ्या स्वर्गीय आजोबांची जयंती. यादिवशी त्यांच्या स्मृतीस ही आमच्याकडून वाहिलेली शब्दांजली !!

साथीदार चा बाबूजी आदरांजली विशेषांक 


मला समजले तेव्हा थोडा उशीर झाला होता,
पण तुम्ही दिलेल्या संस्काराने आम्हा धीर आला होता,
बाबूजी तुम्ही दिलेली शिकवण नक्की पुढे नेणार,
समाजमाध्यम बनून तुमचे विचार पुढे नेणार,

वाट सापडली आम्हा नव जीवनाची,
सोबत आहेच शिदोरी तुमच्या मुल्यांची......

                                                     - तुमचे लाडके नातवंडे

Tuesday 2 December 2014

कळत - नकळत


नुकत्याच सुचलेल्या चार ओळी आणि नंतरच्या त्याचे उत्तर :- 

To
आली कशी कुठून कशी मला कळलेच नाही,
मनात घर केले प्रेमाचे पण मला कळलेच नाही,
स्वप्नात पण येतेस पण मला कळलेच नाही,
प्रेमी मी तुझा पण मला कळलेच नाही,
तुला होतेय का ? ते जे मला कळलेच नाही,

Tee

कळले मला पण वळवून घेतले नाही,
बोलावे वाटले तुला पण शब्द सापडलेच नाही,
 जपून ठेवले मनी जे कधी मला सहज गवसलेच नाही.
आणि जेव्हा गवसले तेव्हा मात्र बोल उमगलेच नाही..........


                                                - गोधानी

Monday 17 November 2014

जीवन म्हणजे ..........!!

सुख दुखा:चा हिशोब म्हणजे जीवन,

आपल्यांसाठी केलेली वण-वण म्हणजे जीवन,

प्रेमासाठी विसरलेलं भान म्हणजे जीवन,

सत्कार्यासाठी ठेवलेली जाण म्हणजे जीवन,

सत्याची नेहमी बाजू घेणे म्हणजे जीवन,

असत्याला निमुटपणे साथ देणे जीवन,

दुसऱ्यांसाठी झटणे म्हणजे जीवन,

अन्यायावर पेटणे म्हणजे जीवन,

कुणासाठीही संपणे म्हणजे जीवन,

शून्यातून मोठे होणे म्हणजे जीवन,

लहानांसाठी छोटे बनणे म्हणजे जीवन,

मोठ्यांना आनंदित ठेवणे म्हणजे जीवन,

शब्दांचा अथांग सागर म्हणजे जीवन.....

- गोपाल अनिलकुमार पालीवाल
 



Friday 14 November 2014

लहानपण देगा देवा.... मुंगी साखरेचा रवा.........!!@@!!


लहानपण येते ते खेळण्यासाठी, बाळगण्यासाठी मज्जा करण्यासाठी पण याच बालपणात काही अनाथ मुलं अजूनही त्या बालपणाच्या आनंदाला मुकले आहेतच ..... कार्यभाग एवढाच की आज बालक दिन असूनही भरपूर मुलांना त्यांचा आनंद घेता आला नाही. चोपड्यात अमर संस्था म्हणून एक सामाजिक संस्था यासाठी सतत झटट असते. त्यांना मदत म्हणून कधीतरी आम्हीही तेथे थोडेफार सहकार्य करतो.

आपणास विनंती आहे, की अश्या सामाजिक कार्यात आपणही सहभाग घ्यावा आणि आपले कर्तव्य पार पाडावे. आपण आमच्या स्व. द्वारकादासजी पालीवाल बहुद्देशीय सामाजिक फौंडेशनद्वारेही या कार्यात आमच्यासोबत येऊ शकतात.
त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे, ९४२३४९१८२३, ९४२३५६३८९२.

शेवटी,

इंडिया मोठा झाला मात्र भारत अजूनही लहान आहे,

तुमची अनमोल सोबतची त्यांना अजूनही तहान आहे......

Thursday 25 September 2014

'बाप' माणूस

वडील म्हटले आधार, दीपस्तंभ आणि उत्तुंग शिखर गाठण्यासाठी प्रेरणास्थान !! हो आज माझ्या वडिलांचा ५४ वा वाढदिवस आहे. आपल्या सर्वांचे "भाऊ" आणि माझे पप्पा, खरच काही क्षण हे आनंदाचे असतात ते आजकाल सोशल साईटवर साजरा होतांना दिसतात. त्यामुळे मला पण वाटले माझ्या वडिलांना ही वाढदिवसाची भेट द्यावी.

बाप हा नेहमी आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा असतो. भाऊंनी (वडिलांनी) चोपड्याच्या पत्रकारितेसाठी केलेले अनमोल कार्य, प्रत्येकालाच दिलेले सज्ञान आणि आणखी बऱ्याच गोष्टी. मी जेव्हा लहान होतो, तेव्हापासून तर मला चोपडा सोडेपर्यंत कोणी ना कोणी पत्रकार होण्यासाठी अजूनही आमच्या घरी येत असतात. भाऊ मला हे लिहायचे, भाऊ या बातमीला शीर्षक द्यायचे, भाऊ वार्तापत्र लिहायचे मुद्दे सांगा ना, मला या पेपरात काम करायचे, मला त्यांना भेटायचे यासारखे अनेक समस्या माझे पप्पा एक मीनटात सोडवतात. आज चोपड्यातील बरेच पत्रकार त्यांच्या लेखणीतून शिकले आणि मोठे झाले आहेत. हे मी आवर्जून सांगेन.

पप्पांनी केलेले प्रत्येक कार्यक्रम मी खूप जवळून पाहिलेत. त्यांनी नेहमी माणसे जोडलीत, आणि अजूनही ते हेच कार्य मोठ्या हिमतीने करत आहेत. या ब्लॉगच्याद्वारे मी वडिलांच्याबद्दल माझ्या मनातील भावना व्यक्त करतोय. माझ्या वडिलांना उदंड आयुष्य लाभो हीच आमच्याकडून पप्पांना शुभेच्छा !!

- तुमचा गोपाला

Thursday 28 August 2014

हे गणराया! मंगलमय कर रे बाबा !!




आजच्या धकाधकीच्या जीवनात परिवर्तन नियमाप्रमाणे होत आहे. याबरोबर माणुसकीही बदलत आहे. मी २०११ ला पत्रकारिता आणि संज्ञापन च्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाला असतांना आम्ही सुसंवाद नावाने अनियतकालिक प्रसिद्ध केले होते. त्यात 'गणेशोत्सव विशेषांक' हा माझा विषय होता. त्यामध्ये मी लिहिलेले संपादकीय आजही तीन वर्षानंतरही तंतोतंत लागू होते. आणि "परिवर्तन हा संसारचा नियम आहे" यावर विश्वासच बसत नाही. यासाठी मुद्दामून ते पान या पोस्टसोबत देत आहे. त्यामध्ये गणरायाला केलेली प्रार्थना या गणेशोत्सवातही करावीशी वाटते. 




सोबतच माझ्या मित्रांने दिलेले लेखही जोडले आहेतच. 

तुम्हाला गणेशोत्सवाच्या शुभेच्छा!!